मोहनाबाई ही गझल सादर करत असताना सुरुवातीला मी त्यांच्या अफलातून अभिनयातच गुंतून गेलो.
मैं नज़र से पी रहा हूं
ये समा बदल ना जाए
ना झुकाओ तुम निगाहें
कहीं रात ढल ना जाए।
मुझे फूंकने से पहले
मेरा दिल निकाल लेना
ये किसी और की है अमानत
कहीं साथ जल ना जाए…
‘मुझे फूंकने से पेहले’ ही ओळ गाऊन होताच थांबून त्यांनी समोर बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं, मला जाळणार नाहीयेत, माझं दफन करणार हैत, तरीसुद्धा….
‘मेरा दिल निकाल लेना’ मधली त्यांची चाकूने हदय खरवडून काढायची अदा तर जानलेवाच होती.
दुसर्या वेळेस ती गझल पहाताना लक्षात आलं, अभिनय आणि अदाकारी इतकीच अफलातून होती ती त्याला दिलेली वेगळी चाल. नेहमी गजलेच्या धाटणीत ऐकलेलं हे गाणं त्या थेट कव्वाली ढंगात सादर करत होत्या.
“ही एवढी सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण चाल कोणाची?” असं विचारताच त्यांचा चेहरा खुलला.
“माझ्या बाबांची…” त्यांच्या स्वरातून आनंद आणि अभिमान ओसंडत होता.
या आधी अनेक वेळा मी त्यांच्या तोंडून त्यांच्या वडिलांचा उल्लेख ऐकलेला होता. त्यांचे अनेक छोटे-मोठे किस्से सहज बोलता बोलता मी ऐकलेले होते. प्रत्येकच व्यक्तीच्या जडणघडणीत आई-वडिलांचा मोठा प्रभाव असतो. अगदी आई-वडिलांशी बिलकुल न पटणार्या मुलांनाही ते त्यांच्याच पोटी जन्माला आले आहेत ही गोष्ट नजरेआड करता येत नाही. पण वडलांच्या मृत्यूला दोन दशकं उलटून गेल्यावरही ज्या बाईच्या रोजच्या बोलण्यात त्यांचा विषय आहे, तिला आपल्या वडिलांबद्दल किती प्रेम वाटत असणार हे मला जाणवत होतं.
एकदा मी नेहमीच्या वेळेपेक्षा थोडं अगोदरच आर्यभूषणला पोहचलो. बायकांच्या आंघोळी नुकत्याच आटोपल्या होत्या. मी मोहनाबाईंच्या रूमवर गेलो तेव्हा त्यांची न्याहारी चालू होती. एका ताटात शिळ्या भाकऱ्या, शेंगदाण्याची चटणी आणि उसळ घेऊन त्या आणि सायरा खात बसल्या होत्या. माझा ‘कॅफे गुडलक’मध्ये आॅमलेट-पाव खाऊन झालेला होता. पण समोरच्या नाश्त्याचा मोह न आवरल्यामुळे मी त्यांच्या ताटातून दोन-तीन घास खाल्ले. थोड्या वेळाने पायल आणि पिंकी त्यांचं ताट घेऊन आल्या. त्यांनी जोडीला बटाटेवडेही मागवले होते. दिवाळी अंकातले माझे लेख वाचून मोहनाबाईंना माझी लेखनशैली आता पुरती पाठ झाली होती. त्या पायलला म्हणल्या, “पायल, भूषणको अपुन कैसे काला करके खाते वो दिखा. फिर तुम्हारे उप्पर भी वो लिखेंगा.
‘मी सकाळी आर्यभूषणला पोहोचलो तेव्हा वातावरण अगदी प्रसन्न होतं. नुकत्याच सगळ्यांच्या आंघोळी आटपून देवपूजा सुरू झालेली होती. पायल आणि पिंकी एकाच ताटात दोन शिळ्या भाकरी, उसळ, चटणी आणि गरमागरम बटाटेवडे घेऊन त्या सगळ्याचा कुस्करत, काला करून खात बसल्या होत्या…’
माझ्या शैलीची ती हुबेहुब नक्कल पाहून आम्ही सगळेच हसायला लागलो. मी लगेच म्हणालो, “मोहनाबाई, आता आज मी स्वत:हून काहीच लिहीणार नाही. तुम्ही बोलणार आणि मी जसंच्या तसं उतरवून काढणार – विषय तुमचे वडील.”
सुरूवातीला नाही नाही करत बाई तयार झाल्या. त्या दिवशी आणि दुसर्या दिवशी मिळून त्या जे काही बोलल्या ते त्यांच्याच शब्दांत…
आमचे बाबा एक अवलिया होते. अब्दुल सत्तार पठाण. नावाप्रमाणे उंच, तगडे, देखणे, रूबाबदार व्यक्तिमत्त्व. त्यांच्या बोटात आन् ओठात प्रत्यक्ष सरस्वती नांदत होती. एकदा एखादं गाणं ऐकलं की ते हुबेहुब पेटीवर उमटत असे. मी त्यांना पेटीवर बसून चाचपडताना असं कधी पाहिलंच नाही.
त्यांचा देवावर विश्वास नव्हता. कधी मशिदीत गेले नाहीत की कुठल्या देवाला नवस बोलले नाहीत. धर्म, देव सब झूठ है म्हणायचे. त्यांनी कधी साधा नमाजबी पढला नाही. पन सगळं कुराण, गीता, रामायण त्यांना माहीत होत. त्यातले दाखले देत ते मधूनच काहीतरी आध्यात्मिक असं वेगळंच बोलायचे. लहानपणी सगळं डोक्यावरून जायचं. मग आस्ते आस्ते समजत गेलं. ‘आपली कला विका पन इज्जत विकू नका’ असं ते नेहमी सांगायचे. एखाद्याकडे शंभर रूपये असतील तर त्यातले वीस हक्कानं घ्या पन त्याहून जास्त एक पै घेऊ नका. ओरबाडून, लुबाडून काढलेला पैसा कधीच लाभत नाही, ही त्यांची शिकवण होती. मला काय तेवढी अक्कल नव्हती, त्यामुळे ते तसं का सांगतात हे न कळताबी मी तसंच वागू लागले. आन तुम्हाला खरंच सांगते, आज त्याचीच चांगली फळं मी भोगतेय. लुबाडून, हावरटासारखे पैसा कमावणाऱ्या बायांचं काय झालंय ते मी बघतेय ना. पैसा पुष्कळ है पन घरची भांडनं, कोर्टकचेऱ्या ह्यात फसल्यात साफ. चणे हायेत तर दात नाहीत अशातली गत झालीये त्यांची. अशा पैशाचा काय फायदा? त्यापेक्षा भाजी-भाकर खाऊन आम्ही सुखात आहोत. शेती है. चांगलं घर है. सगळं चांगल चाललंय.
“बेटा आपण आपलं घर जगवायला या क्षेत्रात आलोय, मग ते करताना इथं येणाऱ्या लोकांची घरं बरबाद करू नका. कुणाचे तळतळाट घेऊ नका.” असं ते सतत सांगायचे.
पूर्वी असं म्हणायची पद्धत होती की, आज पाप कराल तर तुम्हाला ते पुढल्या जन्मी फेडावं लागंल. पन आजकाल जमाना बदललाय. बाबा म्हणायचे तसं ‘ ह्यां कर ह्यां भर’ असं झालंय सध्या. ह्याच जन्मी तुम्हाला पापाचे हिशोब भरावे लागतात आणि पुण्याची फळंबी याच जन्मात भेटतात.
बाबांना मराठी, हिंदी, उर्दू तर उत्तम रीतीने बोलता, लिहिता, वाचता येत होतंच पन इंग्लिश, अरबी, फारशीचं बी ज्ञान होतं. त्यांना शायरी करायचा लई शौक होता. त्यांची तबियेत बी एकदम नावासारखीच सणसणीत होती. पठाण शोभायचे. पन दम्याचा त्रास अधनंमधनं डोक वर काढायचा. एकदा दम्याचा मोठा झटका आला म्हणून आईने त्यांना हॉस्पिटलला दाखल केलं. आम्ही नेहमीसारखं आर्यभूषणला होतो. मी चार दिवसांची सुटी काढली आन घरी गेले. आई तरी एकटी कुठं पुरी पडनार? शेती, घर सगळं तीच सांभाळत होती. दोन दिवसांतच त्यांना बरं वाटलं. मी इकडनं गेल्याशिवाय रेहाना, मुस्कानला सुटी मिळू शकत नव्हती. त्यांनाही बाबांना बघायचं होतं. त्यामुळं मनात नसूनही मी परत पुण्याला जायला निघाले. त्यांचा निरोप घ्यायला गेले तशी मला थांबवलं, म्हणाले, रूक दो मिनीट. एक शेर रचलाय, तो ऐकून जा. त्यांच्या शेरो-शायरीची मी मोठी रसिक होते. माझी दाद एकदम दिलखुलास असायची. काही पटलं नाही तर त्यांना तोंडावर सांगायची. त्यामुळे स्वतः केलेले शेर मला सुनावल्याबिगर त्यांना चैनच पडायचं नाही. मी खुष होऊन ऐकू लागले. बाबांनी चालू केलं.
यू कैद हम हुएँ की हवा को तरस गये
अपनेही कान अपनी सदा को तरस गये
औरोंको दी है हमने नयी जिंदगी
बिमार खुद पडे तो दवा को तरस गये
मला एकदम भडभडून आलं. अफाट प्रेम करणाऱ्या आपल्या बापाकडे त्याच्या पहिल्यावहिल्या आजारपणात आपल्याकडून एवढं दुर्लक्ष झालं का?
“अरे बेटा यह तो सिर्फ एक शेर था. तो पूर्णपणे स्वतःच्या अनुभवांवर असतो म्हणून तुला कोणी सांगितलं? पन आज तू रडलीस अन मी जिंकलो. कारण थोडं खरं, थोडं कल्पनेतलं असं बनलेलं जेव्हा एकदम अस्सल वाटून ह्दयाला भिडतं…बस्स एक शायर को और क्या चाहिये ?” ते डोळे मिचकावत हसू लागले. इतके हसले की त्यांचे बी डोळे भरून आले.
माझा हात पहिल्यापासूनच सैल होता. बाकीच्या बहिणी मात्र लई काटकसरी होत्या. कंजूसच म्हणा ना. त्यांना बाबा नेहमी सांगायचे, ‘विहिरीचा रोजच्या रोज उपसा व्हायला हवा. मग पाणी कसं निर्मळ, गंगाजल बनून येतं. मोहनाचं तसंच है. ती जितकी खर्च करते तितकं तिला जास्त मिळतं. साचवून साचवून ठेवलेलं पाणी कसं सडून जातं तसं तुमचं होईल. तुम्ही बी जरा हात मोकळा ठेवा. गरीबाला दानधर्म करा. मग बघा पैसा कसा स्वतःच्या पायानं चालत येईल ते.”
पन माझ्या बहिनींची सवय काही अजून जात नाही. आन् एका अर्थी बरचं है हो. त्या जपतात, मी उधळते. एक बॅलन्स राहतो.
बाबांकडं शिकवण्याची बी हातोटी होती. गाणं सुरात कसं गायचं हे मी त्यांच्याकडनंच शिकले. आमच्या हितं तुम्हाला माहीतच है, माईक नसल्यामुळं जोरात ओरडून वरच्या पट्टीत गावं लागतं. आवाज फाटन्याची, बेसुरा होण्याची लई भीती असते. तसा तो होऊ द्यायचा नाही हे बाबांनी घोटून घोटून घेतलं. गाणंच काय अदाकारी बी मी त्यांच्याकडूनच शिकले. म्हंजे तू आस्स कर तस्सं कर असं त्यानी स्वतः करून कधीच दाखवलं नाही. पन मी स्वतःहून किंवा दुसर्यांचं बघून जे काय करतेय ते चांगलं है की नाही हे ते नेहमी सांगायचे. “दुसर्याचं बघा जरुर, त्यांनी शिकवलं तर शिकून घ्या, पन शेवटी स्वतःचं काहीतरी त्यात ओता, तरच तुमचा निभाव लागंल. चार बायका करत नाहीत असं वेगळं आपन काहीतरी करायचं आन ते चांगलं करायचं. तरच माणसं तुमचा डान्स पाहायला परत येतील,” अशी त्यांची शिकवण होती.
लहान असताना एकदा मला ताप आला होता. तो बघता बघता वाढत गेला. आमच्या गावचे एकुलते एक डाॅक्टर बाहेरगावी गेलेले होते. तेव्हा बाबा दुसर्या गावच्या डाॅक्टरांना आणण्यासाठी पाच किलोमीटर धावत गेले. त्या डाॅक्टरांकडे स्कूटर होती. पन त्यांना त्यांच्या एका पाव्हन्याला घेऊन यायचं होतं, त्यामुळं बाबा पुन्हा तेवढं अंतर चालत घरी आले. डॉक्टरचं औषध घेऊन मी दोन दिवसांत बरी झाले. डाॅक्टर म्हणाले, पोरगी मरता मरता वाचली. इतकी यातायात करून 10 किमी धावून, चालून मला असा दुसऱ्यांदा जन्म देणाऱ्या माझ्या बाबांच्या शेवटच्या क्षणी मात्र मी नव्हते.
मी, रेहाना अन् मुस्कान थिएटरला होतो. छाया, रझिया आन् आई घरी होत्या. सगळ्यांची जेवणं झाली. बाबांनी नेहमीप्रमानं औषधं घेतली, आपली आवडती टीव्ही सीरियल पाहिली अन् झोपले. झोपेतच त्यांना धाप लागली. बहिणींनी लगेच रिक्शा बोलावली. हॉस्पिटलला नेण्यासाठी रझ्झी, छाया त्यांना रिक्शात बसवून निघाल्या. ते नेहमी बोलायचे “मी छायाच्या हातचं पाणी पिऊन रझ्झीच्या मांडीवर प्राण सोडनार.” नेमकं तसंच झालं. रिक्शातच त्यांना मरणानं गाठलं. मला फोन आला तेव्हा आमची बैठक रंगात आलेली होती. बाबा साधे आजारी बी नव्हते ना. पन रझियाच्या आवाजावरून अंदाज आला. एकदम भिरभिरल्यासारखं झालं. आम्ही तडक निघालो.
“माझ्या मयतीला बिर्यानी करायची. म्हातारपणातलं मरण म्हणजे एक सुंदर अनुभव, तो तुम्ही सण म्हणून साजरा केला पाहिजे. माझ्यासाठी मातम करु नका, मजा करा.” ही त्यांची शेवटची ईच्छ होती. बहिणींनी ती पूर्ण केली. मला वेगवेगळ्या क्षणांचा आठव येऊन उमाळे येत होते. आईला मिठी मारताच मला बाबांनी केलेला एक शेर आठवला,
मंजिलपे पहुचने पर हैरत तो सभी को है
पर किसीने नही देखा इन पाओं की छालों को
खरंच, हसत हसवत त्यांनी इतक्या लोकांना मोठं केलं होतं. मी आपल्या क्षेत्रात मोठ्ठ नाव कमवावं अशी त्यांची फार इच्छा होती. मी ती पुरी करु शकले का? स्वतःच्या पोटच्या गोळ्यांना नाचायला काढताना त्यांच्यातला बाप कधी कळवळला नसंल का? कधी एक मुसलमान म्हणून तर कधी तमाशा कलावंत म्हणून त्यांना किती अवहेलना सहन करावी लागली आसंल? ते कलाकार म्हणून किती मोठे होते हे त्यामागचे सगळेच जाणतात. पन ह्या वाटचालीत त्यांच्या काळजाला जी घरं पडली ती कुणाला कधी दिसलीच नाहीत.
ते जाऊन आज इतकी वर्ष होऊन गेली. ते गेल्यावर मला जितकं दुःख झालं तसं बाकी कधीच झालं नाही. प्रेमात फसून, मान खाली घालून परत नाचायला यावं लागलं त्या वेळेस बी नाही. बाप मेल्याच्या या दुखाःतून मी कधी बाहेर पडेन का असं तेव्हा वाटलं होत. पन काळ हा सर्व दुःखांवरचा जालिम इलाज है. आन आज तर मला ते माझ्यासोबतच हैत असं वाटतं. त्यांच्या आठवणनींनी मला आज दुःख होत नाही, उलट सुख वाटतं. त्यांच्या आठवणींच्या मी इतक्या गाठी मारून ठेवल्यात की त्या मला माझ्या मरणापर्यंत पुरून उरतील.
Illustration by Syafiqah Sharom
Subscribe for new writing
Sign up to receive new pieces of writing as soon as they are published as well as information on competitions, creative grants and more.